२/१४/२०२५
सौ स्मिता चोपडे-खटावकर
:
नमस्कार सेंट लुईस कर,
व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमाचा दिवस हे अलिकडच्या काळात कोणी विसरू म्हटले तरी शक्य नसावे. व्हाॅटसॲपच्या या जमान्यात प्रत्येक सणच इतका वाजत गाजत येतो मग हा दिवस तर प्रेमाचा! मग अशा दिवसाबद्दल चार प्रेमाचे शब्द तर लिहिलेच पाहिजेत ना !!

पाश्चिमात्य का रोमन संस्कृतीमधून आलेला हा सण,कोणा संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ साजरा केला जातो,जो प्रेमाचा पुरस्कर्ता किंवा समर्थक होता म्हणे. आता हा झाला इतिहास.. पण त्यात घुसण्यापेक्षा आपण आज प्रेमाची थोडी विचारपुस करूया.
प्रेम हा मानवाच्या भावभावनांचा एक उत्कट अविष्कार असला तरी काहींच्या मते ती मानवाला पडलेली भूल असते. प्रेम हे बहुरूपी असते त्यामुळे ते ओळखता येणे कठिणच. त्यात ते आंधळेही असते म्हणे, म्हणजे झालेच..त्यालाही आपली ओळख पटणे कठिणच. मग अशा या प्रेमाच्या गावा जावे तरी कशाला? पण तरीही या भुलभुलैय्यात न फसलेला माणूस विरळाच.
उगाच का गालिब म्हणतो,
इश्क़ ने ‘ग़ालिब’ निकम्मा कर दिया
वर्ना हम भी आदमी थे काम के..
म्हणजे प्रेमात पडल्यावर माणूस बिनकामाचा होतो तर...
यावर प्रेमाचे समर्थक असणारे वाचक म्हणतील, प्रेमामुळेच जगण्याला अर्थ येतो आणि हे रूक्ष जीवन सार्थ वाटते. अर्थात ज्यांना प्रेमात पडायचे आहे त्यांनी सांभाळून पडावे असाही सल्ला बरेचदा दिला जातो,
ये इश्क नही आसान इतना ही समझ लीजे..
इक आग का दरिया है और डूब के जाना है..
म्हणजे मारा उडी पण स्वतःच्या जबाबदारीवर. कदाचित या दरियात बुडाल किंवा तरालही. एकंदरीत प्रेमाने मुग्ध झालेले आणि दग्ध झालेले दोन्ही प्रकारचे प्रेमवीर व्हॅलेंटाईन डे ला उसासे टाकताना आढळून येतात. यापलिकडेही अजून एका प्रकार यामध्ये बघायला मिळतो तो म्हणजे प्रेमाचा गुलकंद चाखणारे लोक ज्यांचे वर्णन आचार्य अत्रे आपल्या कवितेत असे करतात,
“प्रेमापायी भरला” बोले
“भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकन्द तरी
कशास हा दवडा?”
रोज गुलाब देऊनही प्रेमात काहीच यश न मिळालेला तो त्याच गुलाबांचा बनवलेला गुलकंद खाऊन समाधान मानतो. म्हणजे फुले देऊनही प्रेमरूपी फळ नसेल मिळालेही तरी निदान फुलांचा गुलकंद मिळाला हे ही नसे थोडके. याउलट लग्नानंतर मिळणा-या बहुमोल प्रेमाला कैद समजणारे नवरे पाहून खेद तर वाटतोच पण ते लोक म्हणजे इश्कच्या दर्यात ना बुडणारे,ना तैरणारे,तर नावेत कोरडे बसून हाकारा करणारे लोक वाटतात.
प्रेमात पडणारे,बुडणारे,अडणारे यांच्याशिवाय,प्रेम या संकल्पनेत ना रस ना ऊस असणा-यांची एक कॅटेगरी असते. प्रीतीची बाग फुलवण्यापेक्षा भाज्यांचे मळे लावले तर बरे असे ते मानतात. म्हणजे प्रेमबीम हे मुळातच स्वभावातच असावे लागते.
तर अशाप्रकारे व्हॅलेंटाईन दिवसानिमित्त प्रेमाची केवळ महती सांगणे हा इथे उद्देश नसून प्रेमाबद्दलचे वेगवेगळे दृष्टिकोन पडताळून पहाण्यासाठी हा प्रपंच होता. बाकी माझे मत विचाराल तर प्रेम ही फार सुंदर व नाजूक भावना असून त्याबद्दल फार विचार करत बसण्यापेक्षा ती अनुभवणे जास्त रास्त आहे.
तसेही,
इश्क़ नाज़ुक-मिज़ाज है बेहद,
अक़्ल का बोझ उठा नहीं सकता...
म्हणून फार बुद्धीवादी विचार करण्यापेक्षा ह्दयाचे ऐकावे हे बरे..
आणि प्रेम हे फक्त प्रेमी युगुलातले असते असेही थोडेच आहे? ते तर खूप वैविध्यपूर्ण असते.
म्हणून शेवटी कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितेच्या ओळी थोड्या बदलून असे म्हणता येईल,
प्रेम कुणावर कराव?
प्रेम कुणावरही करावं..
स्वतःवरही करावं..
दुस-यावरही करावं..
कोणाच्या भोळेपणावर करावं..
कोणाच्या मनमोकळेपणावर करावं..
एकाच्या चाणाक्षपणावर करावं..
दुस-याच्या टोमण्यांवरही करावं..
कोणाच्या धूर्तपणावर कराव..
कोणाच्या उत्फूर्तपणावरही कराव...
कोणाच्या ज्ञानावरही कराव..
कधी अज्ञानावरही कराव..
कोणाच्या बडबडीवरही करावं..
कोणाच्या धडपडीवरही करावं..
कोणाच्या मौनावर करावं..
कुणाच्या अनुमानांवरही करावं..
पण प्रेम जरूर कराव..
अगदी दिलखुलासपणे करावं..

असेच प्रेम ठेवा,
😊🙏🏼
Chanch Lihile aahes Smita. Happy Valentine !!!
"तोंड आबंले असेल ज्यांचे प्रेम निराशेने, प्रेमाचा गुलकंद तयांनी चाखूनी हा बघणे..." प्र के अत्रे ह्यांच्या कवितेचा तू नुसता उल्लेख केलास आणि संपूर्ण कविताच आठवली बघ.
अफलातून लिहलंय, स्मिता!
Loved it ❤️ Smita.
वा! स्मिता, अतिशय सुंदर आणि मनोवेधक लेख! प्रेमाच्या विविध बाजू, त्यातील गूढता आणि गोडवा तू अतिशय सुरेखरीत्या उलगडला आहेस. गालिब, अत्रे आणि कुसुमाग्रज यांच्या ओळींच्या संगतीने लेखाला एक वेगळीच उंची मिळाली. खरंच, प्रेम ही केवळ भावना नसून, ती जगण्याची एक कला आहे. प्रेम फक्त एका दिवसापुरती मर्यादित नसून, ती जीवनभर अनुभवण्याची आणि वाटण्याची गोष्ट आहे. तुझ्या लेखामुळे प्रेमाचा नवा अर्थ समजला. अशाच सुंदर लेखनाने आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहा! 💖🙏🏼