३/२१/२०२५
©️ सौ आरती अत्रे-कुलकर्णी
:
नुकतेच दिलीप प्रभावळकर लिखित विजय केंकरे आणि दिलीप प्रभावळकर ह्यांनी सादर केलेले 'पत्रा पत्री' हे नाट्यवाचन आपण पाहिले, ऐकले आणि अनुभवले.
एक काळ होता, जेव्हा वार्ता पोचविण्यासाठी माणूस माणसांवरच अवलंबून रहात होता. (हंस, कबुतर वगैरे कल्पना...) वाहन नाही, रस्ते नाही, प्रवास पूर्ण होईल का अडचणी येऊन वाटेमध्येच मरण येईल ह्याचीही कल्पना नाही. अश्यावेळी आपली वार्ता, आपले हाल-हवाल, पत्र आपल्या माणसाकडे पोचेल, मग ते कधी कसे आणि केव्हा हे कोणालाही माहिती नसायचे. वार्ता मिळाली, पोहोचली तर त्याकडून येणारी वार्ता पुन्हा आपल्याला कधी मिळेल, हे देखील माहिती नसायचे.

:
इंग्रजांचे राज्य भारतावर आले आणि भारतामध्ये टपाल व्यवस्था सुरु झाली. टपालव्यवस्थेची सुरुवात सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई.
वॉरन हेस्टिंग्ज हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना त्याच्याकडे मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या देखरेखीचे अधिकार होते. त्या काळात सन १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने टपालासोबत वापरायला सुरुवात झाली.
पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला व, त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला.
९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.
'पोस्टल इंडेक्स नंबर' अर्थात 'पिनकोड' हा सहा आकडी क्रमांक असून १५ ऑगस्ट १९७२ पासून ही पद्धत भारतात प्रचलित आहे. डिसेंबर १९७१च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धावेळी लष्करी तळांवर बघितलेल्या टपालवाटपातील गोंधळाने या सर्व अडचणी निपटण्याच्या निर्धाराने ६ आकड्यांवर आधारलेल्या पिनकोडची निर्मिती करून एक सोपी पद्धत अंमलात आणली. श्रीराम भिकाजी वेलणकर हे ‘पिनकोड’चे जनक म्हणून ओळखले जातात. वेलणकर हे गणितज्ञ होते. त्यांनी सहा आकड्यांमध्ये संपूर्ण देशाचा नकाशानिर्मिती केली.
भारतात एकूण ९ पिनकोड विभाग आहेत. पहिले आठ क्रमांक हे भौगोलिक निदर्शक आहेत तर नववा क्रमांक सैन्यदलासाठी राखीव आहे.
:
शाळेमध्ये असताना पत्रलेखनाचा सराव करावा लागे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषा अभ्यासाला असताना प्रत्येकवेळी परीक्षेमध्ये हमखास येणार प्रश्न म्हणजे पत्रलेखन.
पत्राचे दोन प्रकार पडतात. औपचारिक आणि अनौपचारिक. कोणत्याही पत्रावर दिनांक/तारीख लिहिलेली असावी.
माझे वडील सरकारी अधिकारी होते. (सध्या निवृत्त आहेत.) त्यांची अनेक कामाची पत्रे मी लिहून देत असे (कारण माझे अक्षर चांगले, वाचनीय आणि स्पष्ट होते.) सरकारी पत्रांची पद्धत नेहमीच्या पत्रापेक्षा वेगळी असते. त्यात प्रति, माननीय/महोदय, विषय वगैरे... नियम पाळावे लागायचे. व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते.
:
अनौपचारिक पत्र मित्र- मैत्रीणीना, नातेसंबंधी, कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते. साधे पिवळे पत्र, आंतरदेशीय निळे पत्र, मनिऑर्डर, तार, स्पीडपोस्ट ह्या गोष्टी सर्वसाधारणपणे ८०,९० च्या दशकात सहज आणि राजरोस वापरल्या जात असे. त्यानंतर टपालव्यवस्थेमध्येही अनेक बदल होत गेले.
अनौपचारिक पत्रांमध्ये, विधवा स्त्रियांचा उल्लेख करताना 'गंगाभागीरथी' असे त्या बाईच्या नावापुढे लावले जायचे. (गंगाभागीरथी किंवा गंभा कुमुद हिचे सर्व क्षेम आहे.) वडील माणसांचा उल्लेख करताना 'तीर्थरूप, तीर्थस्वरूप' असा उल्लेख केला जाई. साक्षात जे तिर्थ/पुण्यक्षेत्र आहेत असे. (तीर्थरूप वडिलांस, तीर्थस्वरूप दादासाहेब ह्यांस) वयाने लहान असलेल्यांसाठी कुमार/चिरंजीव असे म्हणले जाई. (कुमार मोहन ह्यास अनेक आशीर्वाद)

• स. न. वि. वि. ह्याचा अर्थ असे 'सप्रेम नमस्कार विनंती विशेष'(वैजयंता ह्या मराठी चित्रपटामध्ये पत्रवाचन कवितेमध्ये केल्याचा अनोखाच प्रयत्न आहे. तसा पुन्हा कधी झालेला ऐकण्यात नाही. हे गाणे ऐकले नसेल तर अवश्य ऐकावे आणि पाहावेदेखील. 'सप्रेम नमस्कार विनंती विशेष' अशीच त्याची सुरुवात आहे.)
• 'शिरसाष्टांग नमस्कार' अशी वडील माणसांसाठी सुरुवात केली जायची.
• "अनेक आशिर्वाद" असे लहानांसाठी म्हणले जायचे.
पत्रास कारण कि, असे म्हणून पत्राची सुरुवात होई. सुरुवातीला इतर चौकशी, मुख्य बातमी/हालहवाल वगैरे सांगून शेवटी चौकशी आणि आशिर्वाद असायचे.
पत्राच्या शेवटी,
• कळावे
• कळावे, लोभ असावा
• पत्र मिळताच निघावे.
• पत्राची वाट पहात आहोत, उत्तर द्यावे.
• आपला कृपाभिलाषी
असे म्हणून आपले नाव लिहून पत्र संपविले जाई.
पत्र संपल्यावर काही लिहिण्याचे आठवले असता,
जाता जाता किंवा तळटीप - असे लिहून राहिलेली बातमी लिहिली जायची.
ता. क. - ताजा कलम - जेव्हा एखादी बातमी/वार्ता पत्र लिहिल्यावर समजते तेव्हा नुकतीच समजलेली ताजी बातमी पत्र टपालपेटीमध्ये टाकण्याआधी लिहिली जायची.
:
ह्या सगळ्यामध्ये तार म्हणजे कोणाच्या तरी मृत्यूची बातमी, हे समीकरण पक्केच झाले होते. त्यामध्ये आनंदाचीही बातमी असू शकते, हे मनावर बिंबवायला बरेच वर्षे गेली. तारेमध्ये शब्दाप्रमाणे पैसे पडत असल्याने अत्यंत कमी शब्दामध्ये बातमी समजेल असे लिहिले जायचे.
भारतामध्ये वायरलेस तार यंत्रणा १९०२ मध्ये सुरु झाली. १९४७ नंतर देशातील सर्व भागांमध्ये ही सेवा पुरविण्यासाठी तयारी सुरू झाली. १४ जुलै २०१३ पासून देशातील तार सेवा बंद झाली.
:
ह्यामध्ये आकर्षक गोष्ट म्हणजे पत्रासाठी लागणारे स्टॅम्प्स. धातूची टोकने मागे पडून, १ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकिटे वापरात आली.
लहान असताना ते देखील साठवत असू आणि देवाण-घेवाण करत असू. नुकतेच एका लग्नाला पुण्यामध्ये जाण्याचा योग्य आला. तेथे वर-वधूच्या फोटोचे स्टॅम्प प्रकशित केले. ते त्यांना पत्रासाठी वापरता येणार होते. हे माझ्यासाठी नवीनच होते.

:
पत्र उशिरा मिळाल्याने, चुकीच्या घरी गेल्याने, योग्य वेळेत न मिळाल्याने अनेकदा गमतीजमती घडत. पत्रावरील पत्ता चुकला किंवा नाव सारखे असल्याने भलत्याच घरी गेले तरी कथा घडत असत. ह्या विषयावर अनेक चित्रपट आहेत - पलकों की छांव में (हिंदी), पोस्टमन (तेलगू), पोस्टकार्ड (मराठी), पोस्टमन (शॉर्ट हिंदी फिल्म), पोस्टमन (इंग्लिश).
'पलकों की छांव में' मधील हे गाणे किती समर्पक आहे – “डाकिया डाक लाया... डाक लाया, ख़ुशी का पयाम कही, कही दर्दनाक लाया…”
:
मध्ये 'समिधा' हे साधनाताई आपटे ह्यांचे पुस्तक वाचनामध्ये आले. त्यामध्ये अनेक पत्रे आहेत. ती वाचताना जाणवले कि किती वर्षे झाली शेवटचे पत्र लिहून. पत्रामध्ये बदलत्या काळाचा आरसा आहे.धावत्या विचारांचे प्रतिबिंब आहे. मायना मुखडा शेवट ह्यामध्ये विविधता आहे. नात्याप्रमाणे शब्दांचे बदलते रंग,भावना आहेत.
धाकटा, थोरला, सौ आई/ताई, चिरंजीव, श्रीमान, श्रीयुत असे कितीतरी उद्देशून वापरायचे शब्द पत्रामध्ये वापरले जायचे. आताशा हे शब्दच कमी झाले आहेत. क्षेम, कुशल, लोभ हे शब्ददेखील संपल्यातच जमा आहेत.
लिहायची वेळ येत नाही म्हणून स्वतःचे अक्षरच कसे होते, हे विसरायला झाले आहे. (किरणांच्या यादीपुरते अक्षर दिसते.) कधीतरी ग्रिटींग कार्डवर काही मजकूर लिहायचा असेल तर वेळ जातो, आपले अक्षर आपल्यालाच ओळखता येत नाही. अमेरिकेमध्ये आल्यावर सुरुवातीला मी ५-६ पानी पत्र लिहून माहेरी पाठवले होते. ते शेवटचे पत्र !
आज गंमत म्हणून पत्र लिहायला सुरुवात केली तर कदाचित शब्दही हरवतील, असे वाटते.
पत्रांच्या वर्तमानात, पत्रांचा भूतकाळ समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
मस्त ग आरती !!
पत्रापत्री या कार्यक्रमानंतर तुझ्या या सुरस लेखातून पत्रलेखनाच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायला खूप आवडलच पण पत्रांबद्दलच्या त्या जुन्या गाण्यांसारख्या गोष्टी आठवायला मला मजाही आली. पत्राबद्दल खरच किती विविधांगांनी लिहिल आहेस...
Really very well written article!! keep writing 👍🏼👍🏼👍🏼
स्मिता चोपडे-खटावकर
So true. The art of letter writing is dying, rather has already died. I remember when I first came to America, I used to write letters to my parents and friends and wait anxiously for one from them. The phone calls were so expensive and had to book a trunk call. It would warn you when your 3 minutes were about to end. No free WhatsApp calls. So letters were it! I still have some of those saved after 55 years. Nostalgia!
👌Very informative article. I wasn’t aware of this history of letters.
Amazing read, Aarti. Thanks for taking us on a letter writing journey via wonderfully woven topics including its history. 🙏
I loved reading your thoughts aka letter about letters. 😀
Thanks again for dedicating your time and energy to STLMM website efforts, via blogging. Very much appreciated.